सिरॅमिक कोटिंग म्हणजे काय?
सिरॅमिक कोटिंग हे सहसा सिलिका (SiO2) वर आधारित द्रव असतं. ते पेंटवर पुसून लावलं जातं, आणि क्लिअर कोटला घट्ट चिकटून त्याचा कडक, काचेसारखा थर बनतो. हा थर अतिशय पातळ असतो. XPEL च्या Fusion Plus Paint & PPF कोटिंगच्या डेटा शीटमध्ये ७ मायक्रॉन जाडी दिली आहे, तर Garware ची Premium पेंट प्रोटेक्शन फिल्म सुमारे १९० मायक्रॉनची असते. म्हणजे कोटिंग फिल्मपेक्षा २० पटींहून जास्त पातळ. कोटिंग काय करू शकतं आणि काय नाही, याचं उत्तर इथेच आहे.
आमच्या सिरॅमिक कोटिंग रीलमधली पांढरी टोयोटा फॉर्च्युनर हाच हायड्रोफोबिक फिनिश दाखवते.
9H म्हणजे नेमकं काय?
“9H” हे पेन्सिल-हार्डनेस चाचणीतून (ASTM D3363) येतं. वाढत्या कडकपणाच्या पेन्सिली कोटिंग केलेल्या टेस्ट पॅनलवर घासल्या जातात, आणि खूण न पाडणाऱ्या सर्वात कडक पेन्सिलवरून रेटिंग ठरतं. नेहमीचे पेन्सिल-हार्डनेस किट 6B ते 6H पर्यंत असतात; Gardco च्या 9B–9H सेटसारखे एक्स्टेंडेड किट आणि ISO 15184 चे सेट 9H पर्यंत जातात, जे या स्केलचं शेवटचं टोक आहे. “10H” ही पेन्सिल स्केलवरची ग्रेडच नाही, त्यामुळे हा आकडा कंपनीच्या स्वतःच्या चाचणीतून येतो.
या चाचणीतून इतकंच कळतं की सपाट टेस्ट पॅनलवर कोटिंगला पेन्सिलने खूण पडत नाही. तो पॅनल कसला होता, हेही कंपन्या क्वचितच सांगतात. चावी, धुण्याच्या मिटमध्ये अडकलेली रेती किंवा हायवेवरची खडी, यांबद्दल ही चाचणी काहीच सांगत नाही. काही मायक्रॉनचा थर खालच्या क्लिअर कोटला थोडाच जास्त कडकपणा देऊ शकतो. कोटिंग स्क्रॅच-प्रूफ नाही. अधिक माहितीसाठी आमचं 9H vs 10H vs ग्राफीन कोटिंग मार्गदर्शक (इंग्रजी) वाचा.
सिरॅमिक कोटिंग काय करतं, आणि काय करत नाही?
| करतं | करत नाही |
|---|---|
| दुरुस्त केलेल्या पेंटला चमक आणि खोली देतं | खाली राहिलेले स्वर्ल्स किंवा स्क्रॅच लपवत नाही |
| पाणी थेंब होऊन ओघळून जातं | बोअरचं पाणी त्यावर सुकलं, तर डाग थांबवत नाही |
| हलक्या धुलाईत धूळ-चिखल निघून जातो | स्टोन चिप्स थांबवत नाही (त्यासाठी PPF) |
| पक्ष्यांची विष्ठा व चीक काढायला वेळ देतं | गाडी स्क्रॅच-प्रूफ करत नाही |
| धुलाईतून पडणारे स्वर्ल्स कमी करतं | नियमित, हलक्या हाताने धुलाईची गरज संपवत नाही |
पेंट करेक्शन आधी का?
कोटिंग पारदर्शक असतं, आणि खाली जो पृष्ठभाग असेल त्यालाच चिकटतं. स्वर्ल मार्क्सवर कोटिंग केलं, तर ते आत बंद होतात, आणि आधीपेक्षा जास्त चमकून दिसतात. नव्या गाड्यांवरही वाहतुकीत आणि डीलरकडच्या धुलाईत हलक्या खुणा पडलेल्या असतात. म्हणून आम्ही स्टुडिओच्या प्रकाशात पेंट तपासतो, गरजेइतकं मशीन पॉलिश करतो, आणि कोटिंगआधी पृष्ठभाग पुसून स्वच्छ करतो. आधीचा आणि नंतरचा पेंट तुम्ही स्वतः पाहता, त्यामुळे पैसे कशासाठी देताय ते तुम्हाला नेमकं कळतं.
सिरॅमिक कोटिंग, वॅक्स की PPF?
| वैशिष्ट्य | वॅक्स किंवा सीलंट | सिरॅमिक कोटिंग | PPF |
|---|---|---|---|
| काय आहे | पेंटवरचा मऊ थर | क्लिअर कोटला चिकटलेला, काही मायक्रॉनचा सिलिका थर | १६०–१९० मायक्रॉनची TPU फिल्म |
| साधारण आयुष्य | काही आठवडे ते काही महिने | ग्रेड आणि देखभालीवर अवलंबून; साधारण एक वर्षापासून अनेक वर्षांपर्यंतच्या ग्रेड्स बाजारात | ग्रेडनुसार Garware ची ३ वर्षांपासून लाइफटाइमपर्यंत (पहिल्या मालकासाठी) ई-वॉरंटी |
| पाण्याचे थेंब | हो, पण लवकर कमी होतात | हो | हो |
| स्टोन चिप्सपासून संरक्षण | नाही | नाही | हो |
| सेल्फ-हीलिंग | नाही | नाही | बारीक स्वर्ल्स, उष्णतेने |
टवके हीच मुख्य काळजी असेल, तर पुण्यात PPF किंवा आमचं PPF vs सिरॅमिक कोटिंग मार्गदर्शक (इंग्रजी) पहा. अनेक जण दोन्ही एकत्र करतात: पुढच्या भागाला फिल्म, आणि फिल्मवर व बाकी गाडीला कोटिंग.
पुण्यात सिरॅमिक कोटिंग किती काळ टिकतं?
तुम्ही निवडलेली ग्रेड आणि गाडी कशी वापरली जाते, यावर. लक्ष ठेवायचं ते पाण्यावर: पावसाचं पाणी घट्ट थेंब न होता हळूहळू पसरून ओघळू लागलं, की कोटिंग झिजतंय असं समजा. हे सहसा आधी बॉनेट आणि छतावर दिसतं, कारण तिथे ऊन सगळ्यात जास्त लागतं. कोटिंग कंपन्या स्वतःच्या वॉरंटी अटी ठरवतात, आणि त्या बहुधा मेंटेनन्सशी जोडलेल्या असतात. तुम्ही निवडलेल्या कोटिंगच्या अटी काम सुरू करण्याआधी आम्ही समजावून सांगतो.
काचा, अलॉय आणि ग्राफीनचा पर्याय
विंडशील्ड कोटिंग हा उपयोगी ॲड-ऑन आहे: पावसाचं पाणी थेंब होऊन वेगात उडून जातं. जुलैमध्ये एक्सप्रेसवेवर याचा फायदा नेमका कळतो. विंडशील्ड कोटिंग आणि अलॉय व्हीलच्या कामाबद्दल आमच्या हेडलाइट व अलॉय रिस्टोरेशन पेजवर (इंग्रजी) माहिती आहे. ग्राफीन मिसळलेल्या कोटिंगचा विचार करत असाल, तर पुण्यात ग्राफीन कोटिंग हे पेज पहा.
सिरॅमिक कोटिंगच्या किंमतीत इतका फरक का?
बहुतेक फरक मजुरीचा असतो, बाटलीचा नाही. नव्या गाडीला फक्त हलकं वन-स्टेप पॉलिश पुरू शकतं. पण काही वर्षं उघड्यावर उभी राहिलेल्या आणि ब्रश वॉश झालेल्या गाडीला मल्टी-स्टेज करेक्शन लागतं, आणि त्याला खूप जास्त वेळ जातो. कोटिंगची ग्रेड, थरांची संख्या, आणि काचा, अलॉय व ट्रिम धरले आहेत का, यावरही कोट बदलतात. पुण्यातील साधारण मार्केट रेंज आमच्या सिरॅमिक कोटिंग किंमत मार्गदर्शकात (इंग्रजी) आहेत. तुमच्या गाडीचं मॉडेल आणि ती किती जुनी आहे ते पाठवा, आम्ही कोट पाठवतो.
बुकिंगसाठी तयार?
गाडीचं मॉडेल, ती किती जुनी आहे, आणि उघड्यावर उभी असते की छताखाली, एवढं पाठवा. किती करेक्शन आणि कोणतं कोटिंग योग्य, ते सुचवून आम्ही कोट पाठवू. किंवा थेट मंगळवार पेठेतल्या पिंकस्टुडिओत या, प्रत्यक्ष बोलू.




